साहित्य प्रकार

Saturday, October 6, 2012

स्वत:लाच पेरायचे कुठे कुठे

स्वत:लाच पेरायचे कुठे कुठे
स्वत:लाच वेचायचे कुठे कुठे

उभा जन्म बांधायचा नको तिथे
स्वत:लाच गोवायचे कुठे कुठे

शकूनीच झाले कसे जिथे तिथे
युधीष्टीर शोधायचे कुठे कुठे?

दलालीच फोपावली पदोपदी
स्वत:लाच वाटायचे कुठे कुठे

अशी वाट दूरावते पुन्हा पुन्हा
दिशाहीन चालायचे कुठे कुठे

नको दोष देऊ असा पुन्हा मला
तडीपार हिंडायचे कुठे कुठे

नको वाद घालू नको रडारडी
पुन्हा खेळ मांडायचे कुठे कुठे

Thursday, September 20, 2012

देवा...!

देवा...!
तुझ्यापाठी माझा काहीच त्रागा नाही,
पण इथे माणसाला माणसात जागा नाही.

फुटपातवरही कोणी माणसच असतात    
नि, काचबंगल्यातही माणसच असतात
जी एकाच नभाखाली एकाच जगात रहातात
पण एकत्र असूनही ती एकमेकात मिसळलेली का नसतात?

देवा...!
धरतीला जसा अगम्य रंग चढवलास
तसा इथे प्रत्येकालाच वेगळा घडवलास.

त्या अनुदिनी नक्की तुझ्या मनात काय होतं
जेंव्हा आदिमांच जिवाश्म जन्मास येत होतं?
तुझ्या दिव्य स्पर्शाचं इथे काय चिज होतं?
जेंव्हा आभाळाच्या काळजातूनच आपुलकीच बळ हारवतं.

Sunday, September 16, 2012

चालायाचे नाही मजला

चालायाचे नाही मजला जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा.
झाले गेले गतकाळी ते मनात ठसते पुन्हा पुन्हा.

जिंकावे मी कसे स्वत:ला लढून संगर जीवना?
नियती माझी मला हरवण्या, कंबर कसते पुन्हा पुन्हा

सत्यापाठी पळता पळता विरून जाता स्वप्नही,
उपहासाने नशीब माझे मलाच हसते पुन्हा पुन्हा.

आभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी
अंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा

जख्मांवरती फूंका टाकत, आनंदाने जगू अता
याच मानवी योनीमधले जीवन नसते पुन्हा पुन्हा

आशेच्या या हिंदोळ्यावर, आनंदाने झुलू जरा
स्वप्नांचेही येणे जाणे कधीच नसते पुन्हा पुन्हा

Friday, September 14, 2012

किसीने आपना बनाके मुझको

            जीवनात सर्वाधीक आनंदाची अशी कोणती गोष्ट आहे? .. या प्रश्नाला तसं एकच एक उत्तर असेल असं कधी होणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाप्रमणे अनेकांची अनेक वेगवेगळी उत्तरे असतील. पण मला तरी वाटतं कि, ज्यावेळी एखाद्यास त्याच्या आयुष्यात प्रथमत:च अत्यानंद होतो. आणि त्याला झालेला तो आनंद हा केवळ आपल्यामुळे झालेला आहे. हे जेंव्हा कळते तेंव्हा आपल्याला होणारा आनंद हीच आपल्या आयुष्यातील सर्वाधीक आनंदाची गोष्ट आसते. एका आनंदातून निर्माण झालेला दुसरा अवर्णनिय आनंद. म्हणजेच एका सुखातून उत्पत्ती पावलेलं दुसरं अमर्याद सुख.

           आनंद नावाच्या एका माणसाने, आनंद निर्भर होत याच आनंददायी जीवनाची ही अपुर्व संकल्पना आपल्या शैलीदार अभिनयातून मांडली आहे. कोण हा माणुस?... देवानंद?.... अगदी बरोबर. ... दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी दिग्दर्शीत केलेला पतिता- १९५३. या चित्रपटामध्ये राधा नावच्या एका पतित मुलीची हृदयद्रावक कहाणी आहे. जी आपल्या एका हताने पांगळ्या असलेल्या वडीलांचा व स्वत:चा भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असते. आणि तृतिय स्तरावर असलेल्यांचे जगणे म्हणजे क्षणा क्षणाला एक तारेवरेची कसरत असते. याच मानवी समाज्यातील प्रत्येक घटकाला बांधील नसतानाही प्रत्येक गोष्टीला मनाविरूध्द पण तोंड द्यावेच लागते. तशी ही राधा, एका भिक्षूकेच जगणं जगत असताना देखील या निर्दय जगाला शिताफ़ीने तोंड देत जगता जगता अक्षरशा हैराण झालेली. एकाकी जीवनाला कसलाच आधार नाही. चुरगळलेल्या कागदासारखं आयुष्य आणि ते ही जीव मुठीत धरून जगावं लागतं. एकाकी स्त्री म्हणजेच अबला म्हणून उंबर्‍याबाहेर पडताच प्रत्येक परपुरूषाची नजर एखाद्या विषारी सर्पाप्रमाणे काळजाला डसते. रात्र काळी झाली की, काश्याची चकाकणारी घागर देखिल काळीच दिसते. अशावेळी कसं जगायचं? कोणावर विश्वास ठेवायचा? चहूबाजूने अंधारलेल्या राधाच्या आयुष्यात तिच्या दुबळ्या मनाची केवढी तरी उलाघाल होत असते. आणि अशाच एका काळीजवेळी पैसामागून पैस पार करत  आनंद नावाची एक रोशनी अचानक तिच्या आयुष्यात येते. निर्मल (देवानंद) हा कोण कुठला परका माणुस पण जिव्हाळ्याचं काळीज असलेला कोणीतरी प्रथमच तिला भेटतो. आणि सुरू होते नजरेची जुगलबंदी. अनोळखीतील संकोच्याची आणि संकोच्यातून सलज्ज भावनांची डोळ्यातून स्पष्ट बोलणारी एक अबोल कविताच आकार घेऊ लागते. आणि राधाला ज्या क्षणांचा स्वप्नातही भरवसा न्हवाता त्याची प्रत्यक्ष अनुभूती येऊ लागते.आत्तापर्यंतच्या आयुष्यात तिला भेटलेले सारेच तिचा अव्हेर करणारे, तिला फेटाळणारे होते. पण आज तिचं आंतरमन जाणून घेणारं आणि आत्मीयतेनं बोलणारं व पुढे कधी ना कधीतरी हे जीवनच आपलंस करून घेण्याची आपेक्षा असणारं असं कोणीतरी भेटलं होतं.  अता तिच्या चेहर्‍यावर कधी न्हवे ती हास्याची लाली दिसू लागते, एका अंधार्‍या गुहेतून ती प्रथमच सोनेरी सुर्यप्रकाशात आल्याप्रमाणे स्वत:ला विसरून तनाने आणि मनानेही आत्मनिर्भर होऊन गाऊ लागते......

किसीने आपना बनाके मुझको, मुस्कुराना सिखा दिया
अन्धेरे घरमें किसीने हसके, चिराग जैसे जला दिया |

शरमके मारे मै कुछ ना बोली, नजरने परदा गिरा दिया
मगर वो सबकुछ समज गये है, के दिल भी मैने गवाँ दिया ।

ना प्यार देखा, ना प्यार जाना, सुनी थी लेकिन कहानीयाँ
जो ख्वाब रातों में भी ना आया, वो मुझको दिन में दिखा दिया ।


वो रंग भरते है जिन्दगी में, बदल रहा हैं मेरा जहाँ
कोई सितारे लूटा रहा था, किसी ने दामन बिछा दिया ।

या गाण्यातील मराठी अभिनेत्री राधा म्हणजेच ऊशा किरण हिने गाण्यातील भावमधूर शब्दाला तितकीच साजेशी अशी अदाकारी पेश केली आहे. शब्दांचे वेड असलेल्या एखाद्याला केवळ तिच्या आदाकारीच्या मोहामुळेच हे गाणे प्रत्यक्ष पुन्हा पुन्हा पहावेसे वाटेल. ऊशा किरणची ही लाजवाब आदाकारी वर्णन करताना खरेतर शब्दच कमी पडतात.

शरमके मारे मै कुछ् ना बोली, नजरने परदा गिरा दिया
मगर् वो सबकुछ् समज गये है, के दिल् भी मैने गवाँ दिया ।

ना प्यार् देखा, ना प्यार् जाना, सुनी थी लेकिन् कहानीयाँ
जो ख्वाब रातों में भी ना आया, वो मुझको दिन में दिखा दिया ।   .... आहाहा....  लाजवाब !

            नवतारूण्यातील् ही किती चपखल अशी शब्द् योजना आहे. उभरत्या वयात प्रेमाच्या अनेक् अनोळखी भावनांची आपल्या मनात् कशी अगदी चलबिचल् होत् असते. पर्ंतू प्रत्येक् भावनेचे वा जाणिवेचे इतक्या सहज  सुंदर शब्दात कधीच वर्णन करता येत नाही.


                                               -----------------------------------------   क्रमश:

डोळ्यांनी डोळ्यांशीच बोलावे

डोळ्यांनी डोळ्यांशीच बोलावे
मनाचे गुज मुक्यानेच खोलावे.

नाते नभाशी आपसूक जुळावे
पापणीने पावसा पापणीत तोलावे.

कधी वर्दळीच्या सोडून वाटा
स्वत:स शोधत एकाकीच चालावे

कधी तू मला अन मी तूला ही,
केवळ एका स्पर्शानेच आकळावे.

असो कोणताही ऋतू परंतू,
नाते हे मनामनात दरवळावे

ज्या नभाशी सुर्य होते पेटले

ज्या नभाशी सुर्य होते पेटले
त्या नभाशी पावसाळे दाटले

पावसाने पावसाला गाठले
माणसाने माणसाला लाटले

काय नाही मी मुक्याने सोसले?
भावनेने भावनेला छाटले.

जात नाही धर्म नाही देखिले
मी दुकानी वेदनेला थाटले.

कोळश्याचे कोळशाला वावडे
चांदव्याने काजवेही बाटले.

काय घेऊ काय देऊ मी कुणा
नग्न होते जे मलाही भेटले.